मुंबईच्या मेट्रो-२ आणि मेट्रो-५ या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अधिकाऱयांची गुरूवारी बैठक झाली यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी दिली तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एका रस्त्यासाठीसुद्धा फडणवीस यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.
मेट्रो-२ प्रकल्पामध्ये दहिसर, चारकोप ते मानखूर्द आणि वांद्रे या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी साधारणपणे २५ हजार ६०५ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तर, मेट्रो-५ प्रकल्पामध्ये वडाळा, घाटकोपर ते ठाणे आणि कासारवाडवली या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार ५७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.