मेट्रो-3 च्या आरे कॉलनीतील प्रस्तावित कार डेपोच्या उभारणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून, या अहवालात मेट्रोच्या कार डेपोसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील जागेचा पर्याय देण्यात आला आहे.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत मुंबई मेट्रो लाईन-३ मधील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठीच्या प्रस्तावित कार डेपोमुळे होणारी संभाव्य वृक्षतोड रोखण्यासाठी या डेपोची जागा बदलावी, अशी मागणी विविध संस्थांकडून करण्यात आली होती. त्यामुळे यासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीत एमएमआरडीएचे आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर डॉ. श्याम आसोलेकर आणि दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनचे संचालक एस. डी. शर्मा यांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सादर केला असून तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे.
या अहवालात म्हटले आहे की, कांजूरमार्ग-जोगेश्‍वरी कॉरिडॉर आणि कार डेपो यांचे बांधकाम करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पण, पर्यावरण जपत असतानाच ७५० कोटींचा अतिरिक्त भारही शासकीय तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे कांजूरमार्ग मार्गिका-३ या टप्प्याचे काम करताना ते कुलाबा-सिप्झ कॉरिडॉर आणि जोगेश्‍वरी-कांजूरमार्ग कॉरिडॉर यांच्याशी एकिकृत करावे. ही संपूर्ण व्यवस्था एकसंध असावी आणि त्याची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) व्हावी. यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन महिन्यांच्या कालावधीत कांजूरमार्ग येथील जमीन या प्रकल्पाला दिल्यास एमएमआरसीला पुढील काम सुरू करणे शक्य होईल. एमएमएल-३ या भूमिगत कॉरिडॉरच्या कार्यान्वयन क्षमतेसाठी आरे कॉलनीच्या जागेवर आवश्यक असणाऱ्या केवळ १६ स्टॅबलिंग लाईन्स बांधण्यात याव्यात. मात्र, असे करताना आर्थिक भार फार वाढणार नाही आणि ५०० पेक्षा कमीच वृक्षांवर परिणाम होईल, याबाबत एमएमआरसीने दक्षता घ्यावी, असेही समितीने सूचविले आहे.
कांजूरमार्गचा पर्याय नसल्यास डीएमआरसीने सुचविल्याप्रमाणे आरे कॉलनी येथे सुधारित लेआऊटसह डबल डेक डेपो उभारण्यात यावा. मात्र, अशा स्थितीत या प्रकल्पाच्या खर्चात सुमारे ७५० कोटी रूपयांनी वाढ होईल, असेही या समितीने म्हटले आहे.
आरे कॉलनीतील पर्यावरण हानी टाळण्यासाठी काही उपायसुद्धा या समितीने सूचविले आहेत. या डेपोमध्ये ग्राऊंड वॉटर चार्जिंगची व्यवस्था करण्यात यावी, एक वृक्ष कापावा लागल्यास तीन नवीन वृक्ष लावण्यात यावेत, १० फुटांपेक्षा उंच वाढणारे वृक्ष लावण्यात यावेत, वृक्षारोपणाचे काम संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेकडून करण्यात यावे, असेही या अहवालात म्हटले आहे.