‘मुंबई मेट्रो’च्या तिकीट दरात १ डिसेंबरपासून होणारी प्रस्तावित भाडेवाढ तुर्तास टळली आहे. मेट्रो भाडेवाढीबाबत येत्या १७ डिसेंबरला न्यायालयीन सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत भाडेवाढ न करण्याचा निर्णय मेट्रोच्या वत्तीने घेण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात मेट्रोच्या प्रवासी भाडय़ात पाच रुपयांची तर मासिक पासात देखील ५० रुपयांची वाढ करण्यात येणार होती. ही भाडेवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला होता. मात्र १७ डिसेंबरला भाडेवाढीबाबत न्यायालयीन सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत तरी भाडेवाढ करणार नसल्याचा निर्णय मेट्रोच्या वत्तीने घेण्यात आल्याचे मुंबई मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अनिल बिस्वास यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना १७ डिसेंबरपर्यंत तरी दिलासा मिळणार आहे.
वर्सोवा ते घाटकोपर स्थानकांदरम्यानच्या तिकिटाचे दर १०,२०, ३० आणि ४० रुपये इतके आहेत. त्यात वाढ करून दर १०,२०, २५, ३५ आणि ४५ असे करण्यात येणार आहे. याशिवाय मेट्रोचा मासिक पास दोन टप्प्यात मिळतो. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी ६७५ रुपयांऐवजी ९०० रुपये तर दुसऱ्या टप्प्यातील ७२५ रुपयांऐवजी ९५० रुपये करण्यात येणार असल्याचे गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते. ही भाडेवाढ १ डिसेंबरपासून होणार होती. मात्र १७ डिसेंबरपर्यंत तरी भाडेवाढ न करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे.