रेल्वे बोर्डाने डब्यांना मंजुरी दिल्यानंतर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील पहिल्यावहिल्या मेट्रो रेल्वेला गुरुवारी अखेर हिरवा कंदील मिळाला. ‘मे. सीएसआर नानजिंग पुझेन रोलिंग स्टॉक कंपनी लि.’ या चिनी कंपनीने मेट्रोचे डबे तयार केले आहेत.
मेट्रोसाठी अत्यावश्यक असे रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र २ मे रोजी मिळाले. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर आठवडाभरात मेट्रो सुरू होईल असे मुंबई मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार मिश्रा यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांनी घूमजाव करीत रेल्वे बोर्डाकडून डब्यांची मंजुरी मिळाली नसल्याचे कारण पुढे करत मेट्रो सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर गुरुवारी मंजुरीचे पत्र प्रसिद्ध झाले.
मेट्रोला हिरवा कंदील मिळताच भाजप आणि काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार किरीट सोमय्या यांनी या डबा मंजुरीची घोषणा करत थेट माध्यमांकडेच मंजुरीपत्राची प्रत पाठवली. मेट्रोचे अधिकारी मात्र मंजुरीबाबत काही बोलण्यास तयार नव्हते. आमच्याकडे अद्याप पत्र पोहोचले नसल्याचे पालुपद त्यांनी लावले होते. सोमय्या यांनी काँग्रेसवर कुरघोडी केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनीही मेट्रो रेल्वेसाठी शुक्रवारी मुंबईतील काँग्रेस आमदारांसह मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले.
तिकीटदराचा वाद
प्रकल्प सुरू करताना मेट्रो तिकिटाचा दर ९ ते १३ रुपये असा ठरला होता. पण मेट्रोचे तिकिट ‘बेस्ट’च्या दीडपट असेल या तत्त्वानुसार आता मेट्रोसाठी दहा ते ४० रुपयांपर्यंत तिकिटदर असावा, असे हा प्रकल्प बांधणाऱ्या आणि तो चालवण्याची जबाबदारी असलेल्या ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’चे म्हणणे आहे. त्यावरून राज्य सरकार आणि त्यांच्यात वाद सुरू आहे. मात्र या वादाचा परिणाम मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्यावर होणार नाही, असे ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे आता तिकिटाच्या वादाचे काय होते याकडे मुंबईकरांचे लक्ष असेल.
अशी मेट्रो रेल्वे..
* वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा ११.४० किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग. पाऊण ते एक तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार.
* चार डब्यांच्या गाडीची प्रवासी क्षमता ११७८, सहा डब्यांच्या गाडीची प्रवासी क्षमता १७९२.
* वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, प. द्रुतगती मार्ग, चकाला, विमानतळ मार्ग, मरोळ नाका, साकी नाका, सुभाष नगर, असल्फा रोड, घाटकोपर ही १२ स्थानके