वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेला आता एक महिना झाल्याने ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने सोमवारी नवीन दरपत्रक जाहीर केले. दहा रुपये ते ४० रुपये या प्रस्तावित दराचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याऐवजी मंगळवारपासून सरसकट दहा रुपयांऐवजी १० रुपये, १५ रुपये आणि २० रुपये असे नवीन दर ‘मुंबई मेट्रो वन’ने जाहीर केले आहेत. त्यामुळे आता घाटकोपर ते वसरेवा या पूर्ण प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागतील.
मेट्रो रेल्वेसाठी पहिल्या महिन्यात सरसकट दहा रुपये हा सवलतीचा दर जाहीर करण्यात आला होता. तर आठ जुलैपासून कमाल दर ४० रुपये करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावरून राज्य सरकार उच्च न्यायालयात गेल्याने मंगळवार आठ जुलैपासून तीन किलोमीटपर्यंत १० रुपये, तीन ते आठ किलोमीटपर्यंत १५ रुपये आणि त्यापुढे २० रुपये असा दर जाहीर करण्यात आला आहे. हे दर पुढील महिनाभर राहतील. मेट्रो रेल्वेच्या दरांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. सवलतीचा नवीन दर लागू करण्याची मुभा आहे, असे ‘एमएमओपीएल’ने म्हटले आहे.
दरम्यान, तिकीटदराबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शुल्क निश्चिती समिती स्थापन करण्याच्या मुद्दय़ावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याला नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
मेट्रो प्रवासाचे नवीन दर
* किमान तिकीट – १० तर कमाल तिकीट – २० रुपये (कार्डधारकांसाठी १५ रु.)
* तीन फूट उंचीपर्यंतच्या मुलांना
मेट्रो प्रवास मोफत
* १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना शनिवार-रविवारी सरसकट पाच रुपये तिकीट