मुंबईमधील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या ३३.५ किलोमीटर मार्गिकांच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सल्लागार संस्थांशी करार करण्यात आला. या करारामुळे मेट्रो उभारणीच्या कामास वेग येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त युपीएस मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएमआरडीएच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक रमण्णा, आयकॉम कंपनीचे उपाध्यक्ष थॉमस टँग, पाडेकोचे संचालक मोतोतोशी काकीउची, ईजीसचे संचालक गौरव श्रीवास्तव आणि लुईस बर्जरचे कार्य व्यवस्थापक सीबीएन मुर्ती आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन आणि हाँग काँगच्या आईकॉम एशिया यांच्यात हा करार करण्यात आला. आईकॉम एशिया संस्थेच्या नेतृत्वाखाली जपानमधील पाडेको, अमेरिकेमधील एलजीबी आणि फ्रान्समधील ईजीस रेलया संस्था प्रकल्पाचे सल्लागार मंडळ म्हणून काम करणार आहेत. एमएमआरसीने या कामासाठी जागतिक स्तरावरुन निविदा मागविल्या होत्या. मार्गिकांच्या उभारणीच्या कामासाठी चांगला प्रतिसाद मिळाला असून, ९ कंपन्यांनी यासाठी उत्सुकता दाखविली होती. या समुहामध्ये या कंपन्यांचा समावेश आहे.
हा समूह मेट्रो ३ प्रकल्प अंमलबजावणीच्या संपूर्ण प्रक्रियेत एमएमआरसीला सहाय्य करणार आहे. कामाच्या निविदांचे मूल्यमापन, कंत्राटदाराची नेमणूक, आराखड्यांची तपासणी व आढावा, साहित्य खरेदीच्या निविदा आणि कागदपत्रांचा आराखडा बनविणे, उपकरणांच्या वितरणासह ते स्थापित करण्याच्या कामाचा आढावा, कामाची गुणवत्ता व सुरक्षितता, पर्यावरण आदी बाबींची संपूर्ण जबाबदारी सल्लागारावर असणार आहे. काम पूर्ण करण्याबरोबरच देखभालीची जबाबदारीही सल्लागाराची आहे.