उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘मुंबई मेट्रो’च्या तिकीट दरात होणारी दरवाढ आणखी महिनाभरासाठी पुढे ढकलली गेली आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एमएमआरडीएच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची तिकीटांमध्ये दरवाढ करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना आणखी महिनाभरासाठी का होईना पण दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची सुनावणी आता २९ जानेवारीला होणार आहे. त्याआधी मेट्रोने कोणतीही दरवाढ करु नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मेट्रो प्रशासनाकडून २७ नोव्हेंबर रोजी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात मेट्रोच्या प्रवासी भाडय़ात पाच रुपयांची तर मासिक पासात देखील ५० रुपयांची वाढ करण्यात येणार होती. ही भाडेवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला होता.
मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीने केलेल्या शिफारसींनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये १० ते ११० रुपयांपर्यंत दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एमएमआरडीएने त्यावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती.