आरंभापासूनच मुंबईकरांच्या कुतुहलाचा आणि अभिमानाचा विषय असलेल्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मुंबई मेट्रोवनवर आता २ जुलैपासून वेगमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. सध्या ताशी ६५ किमी वेगाने चालणारी मेट्रो २ जुलैपासून ताशी ८० किमी वेगाने धावेल. या वेगवाढीमुळे भविष्यात मेट्रोवनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मेट्रो सुरू होण्याआधी घाटकोपर ते अंधेरी आणि वर्सोवा हा ११ किलोमीटरचा प्रवास मेट्रोने २१ मिनिटांवर आणल्याने मुंबईकरांची प्रचंड सोय झाली.  गेल्या दोन वर्षांमध्ये मेट्रोने १९ कोटी प्रवाशांची वाहतूक केली असून दर दिवशी सुमारे ३.२० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात.

सुरुवातीच्या काळात मेट्रो ताशी ५० किमी या वेगाने धावत होती. नोव्हेंबर २०१५मध्ये मेट्रोचा वेग डब्यांच्या क्षमतेएवढा वाढवण्यास मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली. त्यानुसार मेट्रोवनने २४ मार्च २०१६पासून मेट्रोचा वेग ताशी ६५ किमी एवढा केला. आता हा वेग ताशी ८० किलोमीटर एवढा केला जाणार आहे. २ जुलैपासून मेट्रो या वेगाने धावेल. त्यामुळे घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर अशा फेरीमागे ३० सेकंद वाचणार आहेत.

  • एक दोन स्थानकांचा अपवाद वगळल्यास मेट्रोच्या दोन स्थानकांमधील अंतर एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी आहे.
  • त्यामुळे ताशी ८० किमी वेगाने गाडी चालवली, तरी प्रवासाच्या वेळेत फार बचत होत नाही.
  • त्यामुळे या वेगवाढीचा प्रवाशांना थेट फायदा मिळणार नाही.
  • पण मेट्रोच्या डब्यांची कमाल वेगमर्यादा ८० किमी एवढी आहे. मात्र, त्यामुळे येत्या काळात फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.