मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली गेल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे. तुर्डेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून याबद्दलची माहिती दिली आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने तुर्डे हे मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत.

मुंबई महापालिकेत पक्षाची साथ न सोडलेल्या संजय तुर्डेंनी आपण राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याचे म्हटले होते. पाच वर्षे मनसेचाच नगरसेवक राहिन, अशी प्रतिक्रिया त्यांनी सहा नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर दिली होती. यानंतर आता तुर्डेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून तक्रार दाखल केली. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडे यांच्याकडून मला शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली होती. शिवसेना हा भविष्यासाठी चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले होते,’ असे तुर्डेंनी म्हटले होते. संजय तुर्डे प्रभाग क्रमांक १६६ चे प्रतिनिधीत्व करतात.

संजय तुर्डे यांच्या आधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अंमलबजावणी संचलनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. यासाठी त्यांनी या दोन्ही संस्थांना पत्रही लिहिले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी मनसेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेने प्रत्येकी ३ कोटी रुपये देऊन मनसेचे नगरसेवक फोडल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तर मनसेचा प्रत्येक नगरसेवक ५ कोटींना विकला गेला, असा आरोप खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरेंनीदेखील केला आहे.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी (दिलीप लांडे, अर्चना भालेराव, स्नेहल मोरे, दत्ता नरवणकर, परशुराम कदम आणि अश्विनी माटेकर) काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी जोरदार तोंडसुख घेतले होते. माफियांच्या माध्यमातून आलेल्या पैशाने शिवसेनेने नगरसेवकांची खरेदी केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे केली. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला असून तसा उल्लेखही त्यांनी अंमलबजावणी संचलनालयाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.