पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय मॉडेल, अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर (५७) यांच्यावर गुरुवारी मालवणी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सुनील पारसकर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना हा प्रकार घडला आहे. आपल्या नावाने फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या ‘एस्कॉर्ट’च्या जाहिरातीची तक्रार घेऊन ही मॉडेल पारसकर यांच्या कार्यालयात गेली होती. तेव्हा तिची त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मढ येथील एका हॉटेलमध्ये नेऊन पारसकर यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मॉडेलने लेखी तक्रारीबरोबर छायाचित्रे आणि चित्रफितीही सादर केल्या आहेत. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात हा प्रकार घडला.
हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या महिला विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांमध्ये नेमका काय वाद झाला आणि तिने सहा महिन्यांनंतर तक्रार का दिली, याबाबत पोलिसांनी काही सांगितले नाही. आम्ही या प्रकरणातील पुरावे तपासत आहोत. त्यानंतर पुढची अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली. पारसकर प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. पोलिसांनीही याप्रकरणी सुरुवातीपासून कमालीची गुप्तता बाळगली होती.