मुंबईसह ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा स्थानकाजवळ पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलीच बॅटिंग केली. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन मंदगतीने धावत होत्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. जलद मार्गावरील वाहतूकही विलंबानेच सुरु होती. दुसरीकडे पावसामुळे ठाणे, डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाणी साचल्याची तक्रार स्थानिकांनी केली. ठाण्यातील मानपाडा येथील नीळकंठ परिसरात महापालिका कार्यालयाची भिंत कोसळल्याची घटना घडली. यात दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले.

काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज ठाण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शहरातील वृंदावन, श्रीरंग आणि मुंब्रा परिसरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे तेथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कालपासून सतत सुरु असलेल्या या पावसामुळे ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे कल्याणच्या दिशेने तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा, असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे शहरात १० ठिकाणी झाडे कोसळून पडली असून त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ठाण्यातील पोखरण रोड येथे झाड कोसळून रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी गाड्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला. तर मुंब्रा येथे दरड कोसळल्याने किरकोळ वाहतूककोंडी झाली होती. परंतु आपत्कालीन विभागाने वेळेतच कोसळलेली दरड हटवल्याने वाहतूक सुरळीत झाली. ठाण्यात २६ ठिकाणी पाणी साचल्यामुळे पालिकेचा नालेसफाइचा दावा फोल ठरला आहे. शहरातील मासुंदा तलाव, उपवन तलाव आणि येउर या ठिकाणी तरुणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तर काही तरुण-तरुणींनी सहलीसाठी बाहेर जाणे पसंत केले.

दरम्यान, रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉगच्या काळात ठाकुर्ली स्थानकाजवळील फाटक बंद करून तेथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५, अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत, तर ५-६व्या रेल्वे मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

तर अंबरनाथ- बदलापूरदरम्यानच्या पुलाची तांत्रिक दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद करण्यात येणार आहे. मेगाब्लॉकपूर्वी पावसामुळे लोकल ट्रेन खोळंबल्याने रविवारचा दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.