मुंबईतील लोकलच्या मासिक आणि त्रैमासिक पासच्या भाडेवाढीवाढीनंतर झालेल्या जनक्षोभाची खुद्द रेल्वेमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. त्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये प्रवासी भाड्यात करण्यात आलेल्या वाढीसोबतच मुंबईतील रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. खासदार रामदास आठवले, किरीट सोमय्या, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, राजन विचारे यांच्यासह विनोद तावडे या बैठकीला उपस्थित होते.
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमातही मुंबईच्या नवनिर्वाचीत खासदारांनी मुंबई आणि ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या अडचणींचा ऊहापोह केला होता व त्या लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासनही दिले. ह्या खासदारांचा ‘रेल्वे’संकल्प नक्की काय आहे, याचा मंगळवारी सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा.

रेल्वेच्या समस्या हा मोठा विषय आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गाचा माझ्या मतदारसंघाशी संबंध येतो. दादर हे येथील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. त्याचे आधुनिकीकरण आणि विस्तार करणे, महिलांसाठी आवश्यक त्या सोयी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी कामे लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेवरील उन्नत रेल्वे मार्गासाठीही मी पाठपुरावा करणार आहे. – पूनम महाजन

रेल्वे प्रवाशांच्या सेवासुविधा व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. प्रत्येक स्थानकावर महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, सुरक्षेच्या दृष्टीने किमान महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, फलाटांची उंची वाढविणे, प्रत्येक रेल्वेस्थानकावर रुग्णवाहिका उपलब्ध असणे आदींकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे. – अरविंद सावंत

रेल्वे सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपनगरीय रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र या महामंडळाकडे निधीच नसल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. या महामंडळाला अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठीच मी आग्रहाने रेल्वेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व मागून घेतले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे अवघड आहे. पण किमान चार-पाच स्थानकांचा समूह करून तेथे तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करणे आणि त्यासाठी जागा देणे गरजेचे आहे. हे सर्व प्रश्न धसास लावणार आहे. – गजानन कीर्तिकर

ठाणे स्थानकावरून दररोज किमान ६ ते ७ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, ही एक मोठी समस्या आहे. ती बांधावीत ही मागणी मी लावून धरणार आहे. शौचालये, पंखे यांसारख्या प्राथमिक गरजांच्या सोयीही अनेक रेल्वे स्थानकांवर नाहीत. काही ठिकाणी सीव्हीएम मशीन बंद आहेत. या सर्व मागण्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले आहे. एकूणच रेल्वे स्थानकांवर आवश्यक त्या सुधारणा करून तेथे प्राथमिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आग्रह धरणार आहे.- राजन विचारे

माझ्या मतदारसंघातील आणि मुंबईतील अतिशय महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दादर स्थानकातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यास अग्रक्रम देण्यात येणार आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांचा विस्तार करण्याचा मानस आहे. महिलांसाठी रेल्वे स्थानकांवर रेस्टरूम उभारणे तसेच विरार, पनवेल या लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी लावून धरण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेमार्गावर एलिव्हेटेड मार्गासाठी अग्रक्रम देण्यात येईल. कुर्ला ते माहुल हा रेल्वेमार्ग सध्या केवळ मालवाहतुकीसाठी वापरला जातो परंतू तो नागरी वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. – राहुल शेवाळे