र्सवकष माहिती देणारे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन रुग्णांसाठी आरोग्यदूत

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाने ‘बीट डायबेटिस एलटीएमएमसी मुंबई’ नावाने मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनवले असून ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मधुमेहाविषयी र्सवकष माहिती देणारे आणि मार्गदर्शन करणारे हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरणार आहे, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. हे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे.

या अ‍ॅप्लिकेशनमुळे जगात आणि भारतातील मधुमेहाचे प्रमाण कळण्यास मदत होईल. त्याचबरोबर आरोग्याची वैयक्तिक माहिती उपलब्ध करून दिल्यास मधुमेह होण्याचे धोके शोधण्यास मदत होईल. तसेच मुंबईतील डायबेटिस क्लिनिकची माहिती, मधुमेह प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शनही अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळणार आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयातील अंतर्गत जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका व प्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या अ‍ॅप्लिकेशनच्या निर्मितीचा संकल्प सोडला होता. ‘बीट डायबेटिस एलटीएमएमसी मुंबई’ नावाने हे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून ते सोमवारी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्या हस्ते या अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले.