मुंबईत डेंग्यूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. मात्र अपुरी धूम्रफवारणी; पालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या; पालिका रुग्णालयांमध्ये जीवनरक्षक पेशी देण्याबाबत उपलब्ध नसलेली सोय, अपुरी औषधे आदी विविध कारणांमुळे डेंग्यूग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. पालिकेच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत असून आरोग्य विभागासाठी भरीव निधीची तरतूद करूनही डेंग्यूवर नियंत्रण करण्यात पालिका अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
डेंग्यू व हिवतापाच्या निदानासाठी आवश्यक असलेली यंत्रणा पालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी पॅथॉलॉजीत धाव घ्यावी लागत आहे. पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना जीवनरक्षक पेशी देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या रुग्णांना खासगी रक्तपेढीत जावे लागत आहे. धूम्रफवारणीच्या यंत्रांची संख्या तुटपुंजी असल्याने प्रत्येक विभागात १५ ते २० दिवसांच्या फरकाने धूम्रफवारणी होत असून डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
परिणामी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका अपयशी ठरत आहे, असा आरोप माजी खासदार संजय निरुपम यांनी केला. संजय निरुपम यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्तसंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले.

‘.. तर पाण्याच्या पिंपात औषध टाकणार नाही’
पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे मिळत नाहीत आणि मानधन १० हजार रुपये होत नाही, तोपर्यंत डास निर्मूलनासाठी घरोघरी जाऊन पाण्याच्या पिंपात औषध टाकायचे नाही, असा निर्धार पालिकेच्या आरोग्य स्वयंसेविकांनी केला आहे. सध्या डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव असताना पालिकेच्या आरोग्य सेवेचा कणा बनलेल्या आरोग्य स्वयंसेविकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.