नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानी ते राजधानी हे ८०० किलोमीटरचे अंतर केवळ दहा तासात पूर्ण करू शकेल, अशा नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गाची घोषणा करून दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती केली आहे. नागपूर-अमरावती-औरंगाबाद-घुटी-मुंबई, असा हा महामार्गा असून केवळ चार वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यावर ३० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली. यापूर्वी युती सरकारच्याच काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे काम तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वत्वास नेले होते. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर आता पुन्हा युतीच्या काळात नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा या मागास भागाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्रालाही फायदा होणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असून, पहिल्या टप्प्यात चार पदरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही, वायफाय, अशा संपर्काच्या अत्याधुनिक सुविधांचा वापर करून हा महामार्ग ‘कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मार्गालगत काही ठिकाणी माहिती तंत्रज्ञान उद्यान, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले उभारण्याचा मानस आहे. या महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर केवळ दहा तासात पूर्ण करणे शक्य होईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या संयुक्त भागिदारीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम केले जाणार आहे. विमानसेवेचा अपवाद सोडला तर सध्या रेल्वेने दूरान्तोने नागपूर-मुंबई हे अंतर दहा तासांचा वेळ लागतो. आता यासाठी नवा पर्यायी पुढील चार निर्माण होण्याची शक्यता आहे.