सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी नव्या विकास आराखडय़ातील असंख्य चुका दृष्टीस आणून दिल्या आणि मुंबईचा नवा विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र तरीही मौनीबाबा बनलेल्या सीताराम कुंटे यांना विकास आराखडय़ातील चुका भोवल्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची पालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली.
मुंबईचा २०१४-३४ या काळातील नवा विकास आराखडा बनविण्याची प्रक्रिया २००९ मध्ये सुरू झाली. समुद्रकिनारे, नदीकाठ, नाल्यांलगतची जागा, खुले भूखंड आदी ठिकाणची तब्बल १६ हजार एकर जागा विकास आराखडय़ात विकासासाठी मोकळी करण्यात आली असून हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याची टीका करण्यात आली. तसेच १९९१-२०११ च्या विकास आराखडय़ातील सुमारे ३० हजारांपैकी बहुतांश आरक्षणे नव्या विकास आराखडय़ात रद्द करण्यात आली असून काही आरक्षणांमध्ये फेरफार करण्यात आला असल्याचा आरोपही सामाजिक संस्थांनी केला होता. त्याचबरोबर नव्या विकास आराखडय़ातून अनेक पुरातन वास्तू, प्रार्थनास्थळे गायब झाल्याचे काही सामाजिक संस्थांकडून उघड करण्यात आले होते. आराखडय़ातील चुकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि चार महिन्यांमध्ये त्यात सुधारणा करून विकास आराखडा सादर करण्याचे आदेश  दिले होते.  कुंटे यांची पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.