विरार, वसई, बदलापूर, टिटवाळय़ातून प्रवासीवाढ

वसईतील वाहन नोंदणीत ५२१ टक्क्यांची उसळी

मुंबईतील उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली असून, यापैकी सर्वाधिक गर्दी मुंबई महापालिकेच्या हद्दीपलीकडील स्थानकांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर नालासोपारा, विरार, वसई, भाईंदर या स्थानकांबरोबरच मध्य रेल्वेवरही बदलापूर, दिवा आणि टिटवाळा या स्थानकांतील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या परिसरात गेल्या चार वर्षांत वाहन नोंदणीत ५२१ टक्क्यांची महाप्रचंड वाढ झाल्याचेही स्पष्ट होत आहे. या भागांमध्ये होणाऱ्या नवनवीन गृहसंकुलांमुळे ही संख्या वाढत असल्याचे आढळत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घरांच्या किमती मुंबईतील गगनचुंबी इमारतींप्रमाणेच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आपल्या स्वप्नाच्या कक्षा रुंदावून मुंबईबाहेरील घरांकडे आपला मोर्चा वळवावा लागत आहे. याचे प्रतिबिंब उपनगरीय लोकलच्या प्रवासी संख्येवरही पडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत ०.६७ टक्के आणि मध्य रेल्वेच्या प्रवासीसंख्येत दोन टक्के एवढी वाढ झाली आहे.

या दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्या अनुक्रमे ३८ आणि ४३ लाख एवढी प्रचंड असल्याने ही अल्प वाटणारी टक्केवारीही जास्त असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.

मुंबईत मोठमोठय़ा गृहसंकुलांसाठी मोकळ्या जागा मिळणे अशक्य आहे, तसेच मुंबईत जागांच्या किमतीही प्रचंड आहेत. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील बडे विकासकही आता वसई-विरार किंवा ठाणे जिल्ह्य़ातील काही महत्त्वाच्या ठिकाणी आपले प्रकल्प राबवत आहेत.

येथे ग्राहकांनाही कमी किमतीत जास्त सोयीसुविधा प्राप्त होत असल्याने ग्राहकांचा कलही या जागांसाठी वाढला आहे.

या भागांमध्ये सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या खूप जास्त आहे, असे जिओप्रिन्युअर ग्रुपचे संचालक अवि शहा यांनी सांगितले.

मुंबईतील जागांचे भाव, येथील व्यवसायांचे विकेंद्रीकरण वसई-विरार, पनवेल-कर्जत, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये वाढलेल्या गृहसंकुल वसाहती यांमुळे यापुढे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील विविध कंपन्या, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी-सीप्झ आदी भागांमध्ये दक्षिण मुंबईतील उद्योग आणि नोकरीच्या संधी एकवटू लागल्या आहेत. त्यामुळे वांद्रे, दादर या स्थानकांपर्यंतच्या प्रवाशांची संख्या भविष्यात जास्त असेल. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे.

– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पश्चिम रेल्वे, मुंबई)

 

वाहन नोंदणीतही प्रचंड वाढ

* रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढत असताना वाहन नोंदणीनेही या भागात नवनवीन उच्चांक ओलांडले आहेत.

* २०१३ या वर्षांत वसई आरटीओमध्ये ४३,३१४ वाहनांची नोंद झाली होती. २०१६ मध्ये हीच संख्या २,६३,१५० एवढय़ावर पोहोचली. ही वाढ तब्बल ५२१ टक्के एवढी प्रचंड आहे.

* कल्याण आरटीओमध्येही २०१३मधील ५,२८,२०२ वाहनांच्या तुलनेत २०१६मध्ये ४२ टक्क्यांनी वाहनसंख्या वाढून ७,५२,११२ एवढय़ावर पोहोचली.

* पनवेलमध्ये २०१३ मध्ये १,५८,००४ वाहनांमध्ये १०९ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या २०१६ मध्ये ३,३१,२१०वर पोहोचली आहे.

प्रवासीसंख्येतील वाढ

स्थानक               टक्केवारी

दिवा                          १०.७९

टिटवाळा                   ७.८७

पनवेल                      ७.५९

बदलापूर                   ७.०५

नालासोपारा              ६.४१

नायगाव                   ३.२०

वसई रोड                 १.६३

भाईंदर                    १.१३