दिवाळी आणि पर्यटन हे गेल्या काही वर्षांत एक घट्ट समीकरण होत चालले आहे. सध्या मात्र दिवाळीची सुटी मोठी असली तरी तीन ते चार दिवसांत जाऊन येता येईल, अशी पर्यटनस्थळे निवडण्यावर वाढता भर आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण वाढले असून गोवा, के रळ या नेहमीच्या आवडत्या ठिकाणांबरोबरच अंदमान आणि निकोबार हे नवे आवडते पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. काश्मीरमधील पूरस्थितीमुळे पर्यटकांनी सिमल्याचा पर्याय निवडल्याचेही दिसून येते.
‘हॉलिडे एलक्यू’ या पर्यटन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतील पर्यटकांचे अंदमान-निकोबारला जाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. साधारणत: दिवाळीच्या सुट्टीत पाचजणांचे कुटुंब किंवा समूह लक्षात घेऊन चार दिवसांसाठी माणशी सहा-सव्वा सहा हजार खर्च येईल अशाप्रकारे पर्यटन क रणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आजही गोव्याला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गोव्यातील पर्यटकांचे प्रमाण १८ टक्के एवढे वाढले आहे. गोव्याबरोबरच कोकण किनारा आणि कर्नाटक किनारा हेही पर्यटनासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहेत, अशी माहिती ‘स्वच्छंद टूर्स’चे गिरीश सावंत यांनी दिली. ऑक्टोबरपासूनचा काळ राजस्थानमध्ये फिरण्यासाठी सर्वात चांगला असतो. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत राजस्थान आणि हैदराबाद हि सुध्दा पर्यटकांची आवडती ठिकाणे बनली आहेत, असे ते म्हणाले.  
‘पैसा वसूल’ पर्यटन हा विचार वाढत आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनावर जितका खर्च केला जातो त्यात थोडी भर घालून परदेशात फिरणे शक्य होते. हे लक्षात घेऊन दुबई आणि श्रीलंका या दोन देशांना नव्याने पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे, असे ‘मँगो हॉलिडेज’चे प्रमुख मिलिंद बाबर यांनी सांगितले.