मुंबईसह देशात वाढलेल्या महिलांवरील विनयभंग आणि छेडछाडीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर यंदा नववर्षांचे स्वागत होणार आहे. सध्याची परिस्थिती आणि मागील अनुभव लक्षात घेता नववर्षांचा जल्लोष निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षांला अलविदा करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासून मुंबईत जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जल्लोषाला गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तब्बल १८ हजार पोलीस तैनात राहणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, महिला छेडछाडविरोधी पथकही तैनात करण्यात येणार आहे.
 
नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांची विशेष उपाययोजना
– गेट वे ऑफ इंडिया, जुहू समुद्रकिनारा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
– गर्दीच्या ठिकाणी साध्या वेषातील पोलीस
– छेडछाड विरोधी पथकाची स्थापना
– गर्दीचे गुप्त पद्धतीने व्हिडियो चित्रिकरण
– जागोजागी बिनतारी यंत्रणा सज्ज
– मद्यपि वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई
– बार मालकांना पबबाहेर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना
– वाहतूक पोलिसांच्या मदतीला सिटी पोलीस
– पाटर्य़ाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त
 
एखादा वाहनचालक मद्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईलच. परंतु त्याने ज्या बारमध्ये मद्यसेवन केले त्या बारमालकाविरुद्धही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाने तशा आशयाचे पत्रच बारमालकांना पाठविले आहे. नववर्षांनिमित्त होणाऱ्या पाटर्य़ामध्ये अंमलीपदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी अंमलीपदार्थ विरोधी विभाग सज्ज झाला आहे. रेव्ह पाटर्य़ा टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचा सायबर सेलही सज्ज झाला आहे. सोशल नेटवर्किंग साईटमधून पाठविण्यात येणाऱ्या पाटर्य़ाच्या आमंत्रणावरही पोलिसांची करडी नजर आहे. रेल्वे पोलिसांनाही रेल्वे स्थानकांत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.