त्रिकूट गोवंडीतून गजाआड

कारवर थाप मारून, घाण टाकून, विनाकारण भांडण करून किंवा खाली पडलेले पैसे तुमचेच का? असे विचारत लक्ष विचलीत करून क्षणात वाहनातील महागडय़ा वस्तू लांबवणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रिय आहेत. पण चालत्या कारमधून धूर येतोय, अशी थाप मारत गाडी दुरूस्त करण्याच्या बहाण्याने चालकाची लुटमार करण्याची नवी पद्धत कुर्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत बडय़ा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अशा प्रकारे लुटमार करणारे त्रिकुट गोवंडीतून गजाआड केले.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रज्वल राजन या बहुराष्ट्रीय कंपनीतील अधिकाऱ्याने स्वत:वर बेतलेल्या प्रसंगाची माहिती देणारा अर्ज कुर्ला पोलीस ठाण्यात दिला होता. राजन पत्नीसह नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते. कुल्र्याच्या हलाव पूल परिसरात एका अनोळखी पादचाऱ्याने राजन यांना त्यांच्या कारमधून धूर येतोय, ठिणग्या उडत आहेत, असे सांगत घाबरवले. राजन यांनी गाडी रस्त्याकडेला उभी केली. ते गाडीची तपासणी करू लागले. इतक्यात अन्य एक  पुढे सरसावला. चालक असल्याचे सांगत त्याने राजन यांना  इंजिनमधील एक सुटा भाग बदलावा लागेल अशी थाप मारली.

या तरूणाने शोरूमच्या नावाखाली एका सोसायटीत राजन यांना आणले. तिथे दुकान नव्हते.  आपण मागच्या बाजुने आलो आहे, अशी थाप तरूणाने मारली. तितक्यात आणखी दोन तरूण आम्ही  मॅकेनिक आहोत, काम आटोपून घरी निघालोय, पण इथल्या इथे गाडीचे काम करून देऊ, असे सांगत त्यांनी कारचा सुटा भाग बदलून राजन यांना दाखवलाही. सुटा भाग आणि तो बसवून देण्याची मजुरी म्हणून या तरूणांनी राजन यांना १४ हजार रुपये देण्यास सांगितले. तेव्हा राजन यांना थोडा संशय आला. त्यांनी या सोसायटीतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना हुंदाई शोरूमबददल विचारले. इथे जवळपास कुठेच दालन नाही, ही तर रहिवासी इमारत आहे, अशी माहिती मिळताच राजन यांना सारा प्रकार लक्षात आला. त्यांनी गर्दी गोळा करताच हे पसार झाले.

भविष्यात अशा प्रकारे कुणाची लूट होऊ नये म्हणून राजन यांनी कुर्ला पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. तपास करताना गोवंडी पोलिसांच्या अभिलेखावर अशा प्रकारे चालकांची फसवणूक करणारे भामटे असल्याची माहिती मिळाली. अब्दुल लतीफ मोईनुद्दीन सय्यद, महोम्मद जाहीद आणि रेहमान शेख या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. राजन यांनी या तिघांची ओळख पटवल्याने त्यांना अटक करण्यात आली.