केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अतिदक्षतेचा इशारा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक महिन्यासाठी संपूर्ण शहरात ना उड्डाणक्षेत्र घोषित केला आहे. या काळात कुठल्याचे प्रकारचे रिमोट कंट्रोलने चालणारे विमान, हेलिकॉप्टर, मानवविरहित विमान (ड्रोन) उडविण्यास तसेच पॅराग्लायडिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबईत गुप्तचर विभागाने दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवून सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यामुळे शहरात अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (अभियान) यांनी सांगितले की, देशविघातक शक्ती शहराची टेहळणी (रेकी) करण्यासाठी अशा मानवविरहित विमानांचा वापर करू शकतात. पॅराग्लायडर्सकडूनसुद्धा आत्मघाती हल्ले होऊ शकतात. त्या पाश्र्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक नोटीस काढण्यात आली असून, ४ जुलै ते २ ऑगस्ट २०१५ या कालावधीत ही बंदी लागून करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कलम १८८ अन्वये (सरकारी आदेशाचे उल्लंघन) कारवाई करण्यात येईल. त्यात सहा महिने कारावास आणि १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे, परंतु पूर्वपरवानगी घेऊन ड्रोन आणि पॅराग्लायडिंग करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी चेंबूरच्या बीएआरसी परिसरात ड्रोनचा वापर करून छायाचित्रे काढणाऱ्या एका संकेतस्थळाच्या दोन कर्मचाऱ्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.