पूर्व उपनगरांमधील महामार्गावर छुप्या रीतीने चालू असलेल्या टांग्यांच्या थरारक शर्यतींना लगाम लावण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
काही श्रीमंत धेंडांनी पैशाच्या बळावर पूर्व उपनगरातील महामार्गावर चक्क टांगेवाल्यांना शर्यतीत उतरवले आहे. या शर्यती ऐरोली, मुलुंड आणि विक्रोळीदरम्यान लावण्यात येत होत्या.  शर्यतीत धावणाऱ्या टांग्यांमागे ५०-५५ मोटारसायकली आणि ७-८ मोटारी धावत असतात.
रविवारी पहाटे अशाच प्रकारे सुमारे १०० जण या शर्यतीचा आनंद लुटत असताना पोलिसांचे एक पथक पूर्व द्रुतगती महामार्गावर दाखल झाले. त्यांनी  चार टांगेवाल्यांना रोखून ताब्यात घेतले.  नवघर पोलिसांनी टांगेवाल्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, टांगेवाल्यांची चौकशी केली असता, हिवाळ्यात आमचा सण असतो व त्यात आम्ही टांग्यांची शर्यत लावतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.