दीड कोटी मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी वाहणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तालयाची सुरक्षाच वाऱ्यावर आहे. सामान्य नागरिकांपासून लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असलेल्या आयुक्तालयात आगंतुकांचे सामान तपासण्यासाठी लावण्यात आलेले स्कॅनर यंत्रणा महिन्याहून अधिक काळ बंद आहे.
क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या मुंबई आयुक्तालयात आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह तीन पोलीस सहआयुक्त आणि महत्त्वाचे विभाग आहेत. अत्यंत संवेदनशील असलेल्या या आयुक्तालयाला असलेल्या चार प्रवेशद्वारांपैकी एकच प्रवेशद्वार सुरक्षेच्या कारणास्तव आगंतुकांसाठी खुले आहे. सामान्य नागरिकांपासून लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी यांचा आयुक्तालयात दिवसभर राबता असतो. दिवसाला किमान हजार व्यक्ती आयुक्तालयात येतात. त्यामुळे प्रवेशद्वारावरच आगंतुकांची द्विस्तरीय तपासणी करण्यात येते. तिथेच, आगंतुक कुठे जाणार आहेत, त्यासाठी त्यांना पास देण्यात येतो. तसेच सामानाची तपासणी करण्याबरोबरच आलेल्या माणसाचीही तपासणी होते. मात्र, सामानाची तपासणी करण्यासाठी असलेले स्कॅनर महिन्याहून अधिक काळ उलटला तरी दुरुस्ती न झाल्याने बंद आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या आगंतुकांची तपासणी करत राहावे लागल्याने, अनेकदा प्रवेशासाठी रांगा लागत आहेत. त्यातच नेमक्या कोणत्या कारणांमुळे स्कॅनर बंद आहे, याची माहितीही अधिकाऱ्यांना नाही. याविषयी पोलीस सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.