ओशिवरा येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येमागे मयत भारती पाल आणि तिचा घरमालाक टिक्कू सिंग यांच्या संबंधांचा पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, भारतीचे सावत्र पिता मयत मनोज पटेल यांचा भाऊ अमेरिकेतून बुधवारी मुंबईत आल्यानंतर मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. तर पाल कुटुंबीयांचे कुणी वारस अद्याप पुढे न आल्याने सोमवारी त्यांच्यावर सरकारी खर्चाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
 २० फेब्रुवारी रोजी अंधेरीच्या ओशिवरा येथे भारती पाल (२५) आणि तिचा भाऊ सोमनाथ पाल या भावा-बहिणीने आत्महत्या केली होती, तर ओशिवरा येथेच अन्य एका इमारतीत या मुलांची आई शीखा पाल आणि तिचा पती मनोज पटेल यांनीही आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली होती आणि मोबाइलमध्ये रेकॉर्डिगही करून ठेवून घरमालक टिक्कू सिंग याला जबाबदार धरले होते. ओशिवरा पोलिसांनी टिक्कू सिंग याला अटक केली आहे. त्याचे आणि भारतीचे प्रेमसंबंध असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यातून वाद झाल्याने हे आत्महत्येचे प्रकरण घडले का, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. डीएनए तपासणीचे नमुने आल्यानंतर तपासातील काही बाबी स्पष्ट होणार आहेत. पोलीस फ्लॅशबॅक पद्धतीने या आत्महत्या नेमक्या कशा झाल्या तेसुद्धा तपासून पाहणार आहेत. दरम्यान, मनोज पटेल याचा भाऊ अमेरिकेतून मुंबईत आला असून त्याच्याकडे मृतदेह सोपविण्यात आला आहे. पाल कुटुंबीयांचे कुणी वारस नसल्याने सोमवारी त्यांच्यावर सरकारी खर्चाने अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.