वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिलीप शिर्के यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप शिर्के कुटुंबियांकडून सोमवारी करण्यात आला. दिलीप शिर्के यांचा मुलगा अभिषेक आणि पत्नीने सोमवारी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. विलास जोशी हे वरिष्ठ असल्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिर्के यांच्या मुलाने सांगितले. माझ्या वडीलांवर न सांगता कामावरून सुट्टी घेतल्याचे जे आरोप करण्यात येत आहेत, ते पूर्णपणे खोटे असल्याचा दावाही अभिषेक शिर्केने यावेळी केला. शिर्के जागेवर नसल्याचं बघून शिंदे व्हिजीट करायचे आणि डायरीत शिर्के गैरहजर असल्याची नोंद  करायचे. याशिवाय, दिलीप शिर्केंचे पद आणि वय यांचा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांना दुय्यम दर्जाची आणि वयोमानाप्रमाणे न झेपणारी कामे दिली जात असल्याचे शिर्के यांच्या पत्नीने सांगितले. जोशी हे वरिष्ठ पदावर असले तरी त्यांना शिर्केंसारख्या ज्येष्ठ व्यक्तीशी बोलण्याची पद्धत नव्हती. निरीक्षक शिंदे हेदेखील नेहमी दिलीप शिर्केंविषयी विलास जोशी यांचे कान भरत असल्याचा आरोप शिर्के कुटुंबियांकडून करण्यात आला. त्यांना वरिष्ठांकडून सतत त्रास होत होता. २०१२ साली त्यांनी २८ दिवसांची आजारपणाची रजा काढली होती. त्याची चौकशी दोन वर्षांनी लावण्यात आली होती. त्यांना सतत दुय्यम दर्जाची कामे दिली जात होती. त्यामुळे ते घरी आल्यावर सतत झालेल्या अपमानाबद्दल आणि त्रासाबद्दल बोलत असायचे. शिर्के यांनी जोशी यांच्यासहीत आधीच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधातही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तर माझ्या आईनेही वरिष्ठांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती, असे अभिषेकने सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून बाबा अधिक तणावात होते. त्यांचा मानसिक छळ व्हायचा असा आरोप अभिषेकने केला.