गोमांसाची विक्री होत असल्याच्या संशयावर पोलिसांनी वरळी येथील एका मटणविक्री दुकानावर मंगळवारी छापा टाकला. महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यांतर्गत राज्य सरकारने गाय व बैल यांचे मांस विकण्यास, खरेदी करण्यास व साठवण्यास बंदी घातली आहे. वरळी येथील मटणविक्री केंद्रावर गोमांस मिळत असल्याची माहिती स्थानिकांकडून कळल्यावर गोमांसविक्रीविरोधात काम करणाऱ्या संस्थेने मंगळवारी सकाळी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. तक्रारीनंतर दुकानातील मटण जप्त करून ते गोमांस असल्याची खात्री करण्यासाठी पशुवैद्याकडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधित विक्रेत्याकडे मांसविक्री करण्याचा परवाना नसल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.