दिल्लीतील एका टॅक्सी कंपनीच्या चालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत टॅक्सी तसेच रिक्षांतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणून शहरातील सर्व टॅक्सी तसेच रिक्षाचालकांची ३१ डिसेंबपर्यंत माहिती जमा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. मुंबईत टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडील टॅक्सीचालकांच्या माहितीचीही खातरजमा करण्यात येणार आहे.
दिल्लीतील ‘उबेर’ कंपनीच्या शिवकुमार यादव नावाच्या टॅक्सीचालकाने गेल्या शुक्रवारी एका २७ वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. त्याला रविवारी मथुरा येथून अटक करण्यात आली. मात्र, चौकशीदरम्यान यादवला यापूर्वीही बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य अधिकच वाढले. टॅक्सीकंपनीने कोणतीही खातरजमा न करता यादवला कामावर ठेवल्याचे स्पष्ट झाले. या पाश्र्वभूमीवर मुंबईत सेवा पुरवणाऱ्या टॅक्सीकंपन्यांकडील चालक तसेच खासगी टॅक्सी-रिक्षा चालक यांची माहिती आपल्याकडे ठेवण्याचे पोलिसांनी ठरवले आहे.  मुंबईत घर भाडय़ाने देताना भाडेकरून माहिती पोलिसांना कळवावी लागते. सुरक्षा रक्षक नेमताना किंवा घरगडी ठेवताना त्याचीही माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. मात्र टॅक्सी आणि रिक्षा चालकांची कुठलीच माहिती पोलिसांकडे नाही. त्यामुळे आता सर्वच टॅक्सी-रिक्षाचालकांची माहिती नोंदवण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवणे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे चालक शोधून काढणे सोपे होणार असल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

आम्ही सर्व टॅक्सी रिक्षा चालकांच्या संघटना, स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेला त्वरीत याबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ३१ डिसेंबपर्यंत ही माहिती एकत्रित केली जाईल.
– राकेश मारिया, पोलीस आयुक्त मुंबई</strong>