वापरावर नियंत्रण आणण्याबाबत मुंबई पोलीस दलात खल

भायखळा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्याने पोलिसांदेखत आजारी मुलीसह पलायन केल्याच्या घटनेप्रकरणात आता नवीन बाब पुढे येऊ लागली असून कैद्यावर पहारा ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या दोन्ही महिला हवालदार मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मोबाइलचा अवाजवी वापर आणि मोबाइल गेमचा सोस यांमुळे त्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाइल वेडावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलीस दलात खल सुरू असल्याचे समजते.

भायखळा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदीने तिच्या आजारी मुलीला जेजे रुग्णालयातून तीन हवालदारांच्या देखत १२ ऑगस्टला पळवून नेले. कैदीच्या सोबत असलेल्या तीन महिला हवालदारांपैकी दोघी जणी त्या वेळी भ्रमणध्वनीमध्ये गढून गेल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीनही हवालदारांना निलंबित करण्यात आले. रेल्वेस्थानकांमध्ये संशयित प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आलेले पोलिसांचे बाकडे असो की नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभे पोलीस. सगळ्यांच्याच हातात भ्रमणध्वनी असल्याचे दिसून येते.

यातील अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमावर गप्पा मारताना किंवा कँडीक्रश, टेम्पल रन खेळताना दिसून येतात. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर भ्रमणध्वनी बंद करून ते गेल्यानंतर पुन्हा कर्मचारी भ्रमणध्वनीत गढून गेल्याचे अनेकदा दिसून येते. पोलिसांसाठी भ्रमणध्वनी ही अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. एका क्षणात हद्दीतील पोलिसांना संदेश पाठविणे त्यामुळे शक्य होते. पण, एकूणच समाजात वाढलेले भ्रमणध्वनीचे वेड साहजिकच पोलिसांतही असल्याचे दिसून येत असल्याचे एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांपैकी २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पोलीस भ्रमणध्वनीमध्ये गढल्याचे दुर्दैवाने आढळून येते असेही या अधिकाऱ्याने अधोरेखित केले.

बंदोबस्तावर असलेले तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. पण, त्याचा वापर मर्यादित आणि गरजेपुरताच असायला हवा. भ्रमणध्वनीच्या वापराने हलगर्जी झाल्यास किंवा कामावर दुर्लक्ष झाल्याने काही चूक झाल्यास कर्तव्यात कसूर असे मानून कारवाई करता येऊ शकते.

अशोक दुधे, प्रवक्ते, पोलीस उपायुक्त (यंत्रणा)