हेमा उपाध्याय हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी फरारच
कलाजगतासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरिश भंभानी यांच्या निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विद्याधर राजभर आजतागायत पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. मुंबईहून भुसावळ, मध्यप्रदेश, तिरुपती, आंध्र, पश्चिम बंगाल अशा शहरांत, राज्यांत फिरत असलेल्या विद्याधरचा गेल्या चार महिन्यांपासून मुंबई पोलीस शोध घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याचा माग काढण्यात पोलीस यशस्वी होत असले तरी त्याला पकडण्यात मात्र, त्यांना अपयश येत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून विद्याधरच्या मागावर असलेल्या पथकाचे भारतभ्रमण मात्र होत आहे.
प्रथितयश चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरिश भंभानी यांची नोव्हेंबर २०१५ मध्ये हत्या करून त्यांचे मृतदेह कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथे फेकण्यात आले. सनसनाटी निर्माण झालेल्या या गुन्ह्य़ाचा तपास करण्यासाठी कांदिवली पोलीस ठाणे यांच्यासोबतीने वरिष्ठ पोलिसांच्या एका विशेष पथकाची निर्मिती केली तर गुन्हे शाखेनेही या गुन्ह्य़ाचा तपास करण्यासाठी तीन कक्ष कामाला लावले. अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्य़ातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकांना यश मिळाले. पण, या दोन्ही हत्या करणारा उपाध्याय यांचा कार्यशाळा सहाय्यक विद्याधर राजभर याने पोलिसांना गुंगारा दिला. हत्येनंतर मुंबई, भुसावळ, मध्य प्रदेश असा प्रवास करणाऱ्या विद्याधरने मध्य प्रदेशातून आपल्या आईशी संपर्क केला होता. मात्र, त्यानंतर तो सातत्याने आपला मोबाइल आणि सीमकार्ड बदलत आहे. त्याचा माग काढत असताना मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तिरुपती, आंध्रप्रदेश, चेन्नई, कोईम्बतूर, पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांत तपास केला. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी तो सिलीगुडी येथे होता, अशी पोलिसांची माहिती आहे. मात्र, त्यानंतर त्याचा काहीही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. विद्याधरने आपले रंगरूप बदलले आहे, तो देवळांमध्ये राहतो, तो बांगलादेश-नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती येत असले तरी यातील नेमके सत्य काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

कुटुंबाशी संपर्कही नाही
अनेकदा गुन्हेगार फरार असताना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क करतात आणि तिथेच फसतात, विद्याधर असा प्रयत्न करतोय का यावरही पोलिसांचे गेले चार महिने लक्ष आहे. पण, या चार महिन्यांत त्याने आपल्या पत्नीशी संपर्क साधण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही.

काही मिनिटांची चुकामूक
विद्याधर दक्षिण भारतात तिरुपतीमध्ये काम मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती हेमाच्या कलाकार मित्रांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांची दोन पथके तिरुपतीला रवाना झाली होती. २० दिवस शोध घेत असताना एके दिवशी विद्याधरने सुरतच्या एका नातेवाईकांना तिरूपतीहूनच दूरध्वनी केल्याचे पोलिसांना कळालेशर्थीचे प्रयत्न करून पोलीस त्या सार्वजनिक दूरध्वनी केंद्रापाशी पोहोचले जिथून विद्याधरने दूरध्वनी केला होता, मात्र मालकाच्या चौकशीत अवघ्या काही मिनिटांपूर्वी तो निघून गेल्याचे पोलिसांना सांगितले.