गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थमुळे कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे कोकणात जाणारी मंडळी पनवेल- पुणे- सातारा- कोल्हापूरमार्गे कोकणात दाखल होतात. त्यामुळे द्रुतगती मार्गावर गणेशोत्सवाच्या काळात टोलमाफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन कोकणात जाणा-या प्रवाशांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवात कोकणात जाणा-या वाहनांना टोलमधून सूट मिळवण्यासाठी नजीकच्या वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयातून काही दिवस आधी पास घ्यावे लागतील. या पासशिवाय टोलनाक्यावर सूट मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकणात जाणा-या वाहनचालकांना आपल्या गाडीचा क्रमांक, स्थानिक पत्ता याचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच कोकणात जाणा-या घराचा पत्ताही द्यावा लागेल. वाहतूक पोलीस आणि आरटीओने दिलेल्या पासधारकांनाच टोलमधून सूट मिळेल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या आठवड्यात एमएसआरडीसी मंत्री एकनाथ महामार्गाची पाहणी केली होती. गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवले नाही तर ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. ३ सप्टेंबरपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करावे असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.