मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील धोकादाक दरडी हटविणे आणि अन्य सुरक्षा विषयक कामे करताना प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेऊनच ही कामे केली जातील. त्यासाठी काही मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्या तरी पूर्णपणे महामार्ग बंद केला जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिली.
मृत्यूचा सापळा ठरलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीप्रमाणेच दोन किलोमीटरच्या परिसरात सात ठिकाणी अशाच प्रकारे दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ७० मीटपर्यंत लांब जाणाऱ्या दोन क्रेनच्या साह्य़ाने या दरडी हटविण्याचे काम त्वरित सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. आडोशी बोगद्याच्या बाजूला वारंवार दरडी कोसळत असल्यामुळे या बोगद्याचा विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यानजीक दरड कोसळल्यामुळे त्या भागातील भुसभुशीत झालेली माती आणि मोकळे झालेले दगड हटवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, हे काम करत असताना कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे काम करत असताना महामार्गाच्या काही मार्गिका बंद ठेवाव्या लागतील, मात्र संपूर्ण महामार्ग बंद ठेवला जाणार नाही. त्याची खातरजमा करण्यासाठी आपण स्वत: बुधवारी २२ जुल रोजी सकाळी द्रुतगती महामार्गाला भेट देणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.

वृत्त चुकीचे
२२ जुल ते ३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवून सुरक्षाविषयक कामे केली जाणार असल्याचे काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवले जाणारे वृत्त चुकीचे असून, असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे िशदे यांनी स्पष्ट केले.