पश्चिम रेल्वेच्या तिकिटांखाली तळटीप; खर्चाच्या ३६ टक्केच उत्पन्न मिळत असल्याची माहिती

दर दिवशी ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करूनही मुंबईची उपनगरीय रेल्वे तोटय़ात असल्याचे विधान रेल्वेतर्फे नेहमीच केले जाते. हा तोटा जवळपास ६४ टक्के असल्याचेही रेल्वेतर्फे सांगितले जाते. आता रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांखाली रेल्वेला किती तोटा होतोय, याची टक्केवारी छापण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना देत प्रवाशांना तोटय़ाची थेट जाणीव करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांखाली तळटीप देऊन हा तोटा दाखवण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या उपनगरीय प्रवासासाठी किमान तिकीट फक्त पाच रुपये आहे. एवढय़ा कमी तिकीट दरांमुळे रेल्वेला उपनगरीय रेल्वे वाहतुकीत प्रचंड तोटा होत असल्याचे रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते.

रेल्वेला तिकिटातून मिळणारे उत्पन्न हे रेल्वेच्या खर्चाच्या तुलनेत फक्त ३६ टक्केच आहे. त्यामुळे रेल्वेला ६४ टक्के तोटा होतो. रेल्वे चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकीही ७० टक्के खर्च हा रेल्वेच्या आस्थापनांवर म्हणजेच कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी होतो. त्यातच आता रेल्वे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाची मागणी करत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रेल्वेने आपल्याला होणारा तोटा प्रवाशांना कळावा, यासाठी आता तिकिटांवर एक तळटीप टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तिकिटांवर ‘रेल्वेला तिकीट विक्रीतून केवळ ३६ टक्के उत्पन्न मिळते’ अशी तळटीप देण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी सध्याचा तिकीट दर आणि त्यातून मिळणारे उत्पन्न खूप कमी आहे. प्रवासी तिकीट दरात वाढ केली नाही, तर भविष्यकाळात रेल्वेला तग धरणे कठीण जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आदेशाची अंमलबजावणी मध्य रेल्वेवरही

रेल्वेच्या या आदेशांची अमलबजावणी पश्चिम रेल्वेने सुरू केली आहे. १६ जूनपासून पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय तिकिटांखाली ही ओळ छापण्यास सुरुवात झाली आहे. तर १७ जूनपासून रेल्वे बोर्डाच्या आदेशाची अंमलबजावणी लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांवरही ही छपाई सुरू झाली आहे. लवकरच या आदेशांची अंमलबजावणी मध्य रेल्वेवरही होणार आहे. रेल्वेच्या नुकसानीबाबत प्रवाशांना सजग करणे, एवढाच रेल्वेचा हेतू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.