रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक, त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी आणि प्राध्यापकांनी घरीच राहणे पसंत केले. परिणामी रविवारी उत्तरपत्रिका मूल्यांकन आणि निकालाचे काम अपेक्षेपेक्षा कमी झाले.

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या बालहट्टाचा परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागत असतानाच निकालाच्या कामाला गती यावी या उद्देशाने राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाची धुरा सक्षम खांद्यावर सोपवली आहे. नव्या चमूने काम हाती घेतल्यानंतर पहिले आठ दिवस तांत्रिक घोळ सावरण्यातच गेले. त्यावर मात करत कुठे तरी कामाला वेग आला तोच रविवारी मेगा ब्लॉक आणि पावसाचे विघ्न आड आले. यातच आता येत्या आठवडय़ात सुरू होणारा गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या सुटय़ा लक्षात घेत निकाल कधी हाती मिळेल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.

मेगा ब्लॉक आणि पावसामुळे रविवारी उत्तरपत्रिका तपासणारे प्राध्यापक आणि परीक्षा विभागातील कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती फारच कमी होती. परिणामी रविवारी खूप कमी वेगाने काम झाल्याचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. धीरेन पटेल यांनी सांगितले.

अवघ्या २५०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन

हजारो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी असतानाच रविवारी अवघ्या २५०१ उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन झाले असून २०४१ उत्तरपत्रिकांच्या नियमनाचे काम झाले आहे. इतर दिवशी किमान पाचशेच्या संख्येने उपस्थित राहणारा प्राध्यापक वर्गाच्या संख्येत घट होऊन रविवारी अवघ्या १३१ प्राध्यापकांनी उपस्थिती लावली.

सहा निकाल जाहीर

रविवारी प्रत्यक्षात किमान दहा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कमी कर्मचारी वर्गामुळे सहा निकालच जाहीर झाल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांकडून समजते. या सहा निकालांमध्ये बीए, बीएमस आणि बीएस्सीच्या सहाव्या सत्राच्या निकालांचा समावेश आहे.