फलाट असलेल्या सर्व स्थानकांवर थांबवण्याचा प्रस्ताव

मुंबईला येण्यासाठी दोन-दोन धीम्या गाडय़ा सोडून जलद गाडय़ांची प्रतीक्षा करणाऱ्या मध्य रेल्वेवरील ‘वेगवेडय़ां’ची येत्या काही काळात घोर निराशा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर सध्या भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे आणि डोंबिवली या स्थानकांवरच थांबणाऱ्या जलद गाडय़ा फलाट उपलब्ध असलेल्या सर्वच स्थानकांवर थांबवण्याबाबतचे नियोजन सुरू आहे.

डोंबिवली किंवा ठाणे ही स्थानके वगळल्यास ठाण्यापुढील स्थानकांवर गेल्या काही वर्षांत प्रवासी संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र या स्थानकांमधून खूप मोजक्याच जलद गाडय़ा सुटत असल्याने उर्वरित प्रवाशांना धीम्या गाडीनेच प्रवास करावा लागतो. तसेच जलद गाडीने प्रवास करणाऱ्यांमध्येही ती गाडी कोणत्या स्थानकावर थांबणार, याबाबत कधीकधी गोंधळ उडतो. काही गाडय़ा मुलुंड, काही भांडुप, तर काही विक्रोळीला थांबतात. हा गोंधळ दूर करण्यासाठी येत्या काळात सर्वच जलद गाडय़ांना जवळपास सर्वच स्थानकांवर थांबा देण्याचा विचार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, जलद गाडय़ांना सर्व ठिकाणी थांबा दिल्यानंतर गाडय़ांच्या परिचालनात काय फरक पडेल, गाडय़ांची प्रवास वेळ वाढेल का, याबाबत संबंधित विभागांकडून चाचपणी करावी लागेल. त्यानंतरच याचा अंतिम निर्णय होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

निर्णय झाल्यास..

* जलद गाडय़ा कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या सर्वच स्थानकांवर थांबतील

* तसेच दिवा स्थानकात जलद गाडय़ांसाठी प्लॅटफॉर्म लवकरच तयार होत आहे. ते काम पूर्ण झाल्यावर सर्वच जलद गाडय़ांना तेथेही थांबा दिला जाईल

* परळ, माटुंगा आणि शीव या स्थानकांत १२ डब्यांचे प्लॅटफॉर्म नसल्याने येथे थांबा दिला जाणार नाही