कल्याण- अहमदनगर महामार्गावरील रायते गावाजवळील पुलावरील वाहतूक सुमारे तासभर बंद होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र पावसाचा जोर वाढल्यास या पुलावरील वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाचे एक पथक या पुलावरील वाहतुकीकडे लक्ष ठेवून आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरला बुधवारी पावसाने झोडपून काढले. मंगळवारी रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने कल्याण ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. याचा फटका कल्याण- नगर मार्गाला बसला. कल्याण- नगर मार्गावरील रायते गावाजवळील पुलावर नदीने धोक्याची पातळी गाठल्याने संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली. तहसीलदार, महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर ओसरला. मग या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली. मात्र स्थानिक प्रशासनाचे पथक नदीच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले.

मुंबई आणि ठाण्यात येणारा भाजीपाला आणि दूध नगर- कल्याण मार्गेच येतो. पहाटेपासून या मार्गावर टेम्पो आणि दुधाच्या टँकरची वर्दळ असते. याशिवाय नगर- कल्याण मार्गावरुन एसटी बसेसही मोठ्या प्रमाणात धावतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यास मुंबईच्या अडचणी वाढू शकतात. हा मार्ग बंद झाल्यास नाशिक आणि पुणे हे पर्यायी मार्ग आहेत. मात्र यात वेळ जास्त लागतो. दरम्यान, मुंबईत बुधवारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु होती. कल्याण, बदलापूर या भागात मंगळवारी संध्याकाळपासून ते बुधवारी संध्याकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. बुधवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर ओसरला आहे.