निसर्गानुसार सण साजरे करण्याची भारतीय संस्कृती. वसंतात बहरत असलेल्या वृक्षांच्या सोबतीनेच आपले नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळेच एकीकडे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी तयारी सुरू असतानाच शहरातील वृक्षही फुलांनी डवरले आहेत. डांबरी रस्त्यांवर आधार शोधत कसेबसे उभे राहत वर्षभर सावली देणाऱ्या मुंबईच्या झाडांचे सौंदर्यही या काळात खुलून येत आहे.
सीताअशोक, पळस, सोनमोहोर, गुलमोहोर, तामण, बहावा, काटेसावर, चाफा, पिचकारी.. मुंबईच्या रस्त्यांवर विपुल प्रमाणात असलेल्या या झाडांवर लाल-पिवळ्या रंगाची उधळण होऊ लागली आहे. शहरातील उरलेसुरले पर्जन्यवृक्षही स्वतचे अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत बहरले आहेत.
डिसेंबर-जानेवारीमध्ये पानगळ झालेले वृक्ष नंतरच्या महिन्यांमध्ये मोहरू लागतात. मुंबईतील बाष्पयुक्त वातावरणामुळे निष्पर्ण वृक्ष पाहायला मिळत नसले तरी नव्या पोपटी, नाजूक, चमकदार पानांची नवलाई तेवढीच मोहक असते. िपपळ्यासारख्या वृक्षांची नवी पालवी तर केवळ पाहात राहावी अशीच..
नव्या पर्णसांभारासोबतच वसंत ऋतूत फुलांचेही आगमन होते. विविध रंगछटांच्या फुलांचे वैविध्य पाहायला मिळत असले तरी सुवर्णपिवळ्या आणि लालजर्द रंगांचा त्यात वरचष्मा आहे. पिवळ्या फुलांचा सडा पाडणारे पेल्टोफोरम म्हणजे सोनमोहोर मुंबईच्या सर्वच भागांमध्ये दिसतात. त्याचसोबत १०० मीटरहून अधिक घेर असलेल्या पर्जन्यवृक्षांच्या नाजूक फुलांच्या बहराचे देखील हेच दिवस.
गेल्या चार वर्षांत पर्जन्यवृक्ष मरणपंथाला लागले असतानाच उरलेसुरले जीव मात्र सर्वागाने बहरताना दिसत आहेत. स्पॅथोडिया म्हणजे पिचकारी हादेखील विदेशी वृक्षच. पेन्सिलसारख्या दिसणाऱ्या या फुलझाडांची संख्याही आता वाढलेली आहेत. सिल्क कॉटन ट्री म्हणजे काटेसावरही फुलतोय. या झाडाचे वैशिष्टय़ म्हणजे मुंबईतील इतर झाडे शिशिरातील पानगळीतही पाने टिकवून ठेवत असली तरी हे झाड मात्र बाष्पयुक्त वातावरणातही सर्व पाने काढून फक्त काटय़ांसह उभे राहते. काटेदार झाडांवर आलेली लालचुटूक फुले लांबूनही अगदी नजरेत भरतात.
श्रीलंकेत सीतेच्या सोबतीला असल्याची दंतकथा असलेला सीताअशोकाचा बहरही याच काळात असतो. या लालपिवळ्या फुलांमध्ये राज्यफूल असलेला देशी तामण मात्र वेगळा उठून दिसतो. जांभळ्या रंगाची ही फुले चटकन लक्षात येतात.
ही सर्व फुलझाडे बहरत असतानाच चाफा, मुंबईकरांना लाडका गुलमोहोर आणि सोनपिवळ्या रंगाचा बहावा हेदेखील येत्या काळात बहरण्यास सुरुवात होईल. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हात थंड सावली देताना डोळ्यांनाही आनंद देणाऱ्या या वृक्षांची शहराच्या सर्वच भागात उपस्थिती असली तरी भायखळ्याचे जिजाबाई उद्यान, कुलाब्याचे सागर उपवन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी येथे बहुसंख्येने असलेल्या जातभाईंचा बहर आवर्जून पाहण्यासारखा असतो.