संपूर्ण देश ‘मोदीलाटे’वर असताना मुंबईत त्याच्या जोडीला उष्म्याची लाटही आली आहे. उष्म्याच्या लाटेमुळे तापमापकामध्ये विक्रमी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे आठवडय़ाच्या सुरुवातीलाच सोमवारी, या लाटेमुळे गेल्या दहा वर्षांत मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. सोमवारी मुंबईतील कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस इतके होते, तर या चढलेल्या तापमानाच्या जोडीला हवेत ६९ टक्के आद्र्रताही असल्याने मुंबईकरांना उकाडा आणि घाम असा दुहेरी तडाखा बसला. याआधी २०१० मध्ये १ आणि १० मे या दोन दिवशी ३७ अंश सेल्सिअस एवढय़ा तापमानाची नोंद झाली होती.
गेल्या वर्षी पाऊस हिवाळ्यापर्यंत लांबल्यामुळे यंदा तापमापकातील पाऱ्याने मुंबईत फार वेळा पस्तिशी ओलांडली नाही. १७ आणि १९ मार्च या दोन दिवशी अनुक्रमे ३८ आणि ३७ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. मात्र या दोन्ही दिवशी सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण ३८ आणि ४० टक्के एवढेच असल्याने उन्हाचे फक्त चटके जाणवले होते. मात्र मे महिन्यात हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने उन्हाच्या चटक्यांबरोबरच घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ४१ अंश सेल्सिअस एवढे तापमान १२ मे १९७९ रोजी नोंदवले गेले होते.