एकीकडे डासांच्या वाढीला अनुकूल पाणीसाठे आणि दुसरीकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोसायटीत बंदी, अशा दुहेरी पेचातून सुटण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्थानिकांमधूनच कार्यकर्ते नेमण्याचा मार्ग काढला आहे. गेल्या तीन वर्षांत डासांचे ‘हॉट स्पॉट’ आढळलेल्या इमारतींमधील काही रहिवाशांना प्रशिक्षण देऊन डास उत्पत्तिस्थाने रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.
डेंग्यूचे निदान करणारी चाचणी विकसित
मलेरिया व डेंग्यूचे डास शोधण्यासाठी दरवर्षी कीटकनाशक विभागाचे कर्मचारी लाखभराहून अधिक ठिकाणांची पाहणी करतात. मात्र एका चमचाभर पाण्यातही डास अंडी घालत असल्याने लाखो जागा पाहणीविना राहतात. घरात, गच्चीत, पाण्याच्या टाकीच्या झाकणातही डासांची पैदास होत असून या सर्व जागा पालथ्या घालणे पालिकेला शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाच या संदर्भात प्रशिक्षित केले जात आहे. गेल्या तीन वर्षांत डासांचे त्यातही डेंग्यूच्या एडिस इजिप्ती डासांचे सातत्याने उत्पत्तिस्थान आढळलेल्या इमारतींमध्ये या मोहिमेची सुरुवात होईल.
या इमारतीमधील ज्येष्ठ नागरिक, उत्साही तरुण किंवा स्त्रियांना पालिकेकडून दीड ते दोन तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. डेंग्यू डासांची उत्पत्ती कुठे होऊ शकते, ती कशी थांबवायची, प्रतिबंधात्मक उपाय कोणते, अळ्या आढळल्यास काय करायचे याची माहिती दिली जाईल. ज्या उच्चभ्रू इमारतींमध्ये असे प्रतिनिधी उपलब्ध नसतील त्यांना हाउसकीपिंग किंवा कीटकनाशक कंपन्यांची नेमणूक करावी. हे स्थानिक असल्याने त्यांना इमारतीत सहज पाहणी करता येईल. पालिकेचे कर्मचारी देखरेख ठेवतील.
डासांची उत्पत्तिस्थाने रोखणे ही रहिवाशांचीही जबाबदारी आहे. त्यांना त्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. मात्र पावसाळ्यात उत्पत्तिस्थाने आढळल्यास इतरांप्रमाणेच या इमारतींनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी माहिती कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली. गेल्या वर्षभरात पालिकेने सुमारे १८ हजार नागरिक व सोसायटय़ांना नोटीस पाठवली असून त्यातील १२१५ जणांवर खटलेही दाखल केले आहेत.

आधी नकार आणि मग या या..
डेंग्यूच्या रुग्णाच्या घरातच एडिस इजिप्ती डास आढळण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. हे डास घर व त्याच्या परिसरातच अंडी घालतात. तरीही डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्यासाठी गेलेल्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना उच्चभ्रू इमारतींमध्ये तोंडावर दारे आपटून बंद करण्याचा अनुभव अनेकदा आला आहे. मात्र या वर्षी हिवाळा लांबल्याने डेंग्यूने मांडलेले थैमान व शेजारीपाजारी झालेला मृत्यू पाहून घाबरलेली हीच मंडळी कर्मचाऱ्यांना आवर्जून घरी बोलावून डास शोधण्यास सांगत होती.

अ‍ॅनाफेलिस डासाची शोधमोहीम
*निरीक्षण केलेल्या जागा –
१ लाख १४ हजार ६३५
*सापडलेली उत्पत्तिस्थाने –
१२ लाख ९१ हजार ४४२
*अ‍ॅनाफेलिसची उत्पत्तिस्थाने – ४,९९२

डेंग्यूच्या एडीस इजिप्ती डासाची शोधमोहीम
*घरे – १,०८ ,७४,१२२
*उत्पत्तिस्थाने – ९७ ,७१,५४९
*एडीस उत्पत्तिस्थाने – ८,५५५
*सूचनापत्रे – १७,९०४
*ताकीद पत्रे – १८८५
*खटले – १२१५
*दंड – ३२,५१,१०० रुपये