डेंग्यूचे निदान झालेल्या मुलुंडमधील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलेल्या तिच्या आई-वडिलांना गेल्या आठवडय़ात जवळच्या रुग्णालयात जागाच सापडत नव्हती. सर्व जागा तापाच्या रुग्णांनी भरल्या होत्यात. तापामुळे क्षीण झालेल्या मुलीला घेऊन त्यांना अखेर दूरचे रुग्णालय गाठावे लागले.. अर्थात हे एकमेव उदाहरण नाही. गरज नसतानाही केवळ भीतीने रुग्णालयातील जागा अडवलेल्या रुग्णांमुळे ही वेळ अनेकांवर येत आहे.
डेंग्यूच्या निश्चित रुग्णांची सप्टेंबरमधील संख्या अवघी १६३ असली तरी संशयित रुग्णांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. त्याचप्रमाणे डेंग्यू नसलेले मात्र तरीही डेंग्यू असल्याच्या भीतीने रुग्णालयात दाखल होत असलेल्या साध्या तापाच्या रुग्णांची संख्याही हजारोंच्या घरात असल्याने शहरातील खासगी रुग्णालये भरल्याचे दिसत आहेत. डॉक्टरांवर दबाव टाकून रुग्णालयात उपचार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे खरोखरच गरज असलेल्या रुग्णांवर खाटा शोधण्याची वेळ आली आहे.
डेंग्यूमुळे या वर्षभरात तीन मृत्यू झाले आहेत. डेंग्यूवर घरात राहून तोंडावाटे औषधांद्वारेही उपचार होतात. अगदीच दोन टक्के रुग्णांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज पडते. तोंडावाटे घ्यायच्या औषधांसोबत योग्य आहार, भरपूर पाणी व विश्रांती घेतली की डेंग्यू बरा होतो. त्यामुळे रुग्णालयात जाण्याचा अट्टहास कमी करायला हवा, असे डॉ. सुहास पिंगळे म्हणाले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्रीय विभागाकडूनही देशभरातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार ओटीपोटात तीव्र वेदना, उलटय़ा, तापात सतत चढउतार, रक्तस्राव, यकृतदाह, मानसिक स्थिती बिघडल्यावरच रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण होत असते. रक्तस्राव आणि प्लेटलेट्सची संख्या दहा हजारांखाली गेल्यावरच प्लेटलेट्स चढवाव्या, अन्यथा त्या जास्त हानिकारक ठरू शकतात. मात्र तरीही घाबरून रुग्णालयात दाखल होत असलेल्या लोकांना डॉक्टरांवर दबाव आणू न देण्याचे आवाहन आयएमएचे सरचिटणीस डॉ. के. के. अगरवाल यांनी केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांना भाग पाडणाऱ्या रुग्णांमुळे इतर गरजू रुग्णांची जागा अडतात असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळा संपत असताना डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. वर्षभरात आतापर्यंत ४७० रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासण्यांअंती निश्चित करण्यात आले. मात्र तपासण्या केलेल्या नसतानाही केवळ लक्षणांवर डेंग्यूचे उपचार घेणाऱ्या संशयित रुग्णांची अधिकृत नोंद तीन हजारांवर गेली आहे. त्यातही केवळ सप्टेंबर महिन्यात साध्या विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची पालिका रुग्णालयातील संख्या आठ हजारांहून अधिक झाली आहे. साधारण तीस टक्के रुग्ण पालिकेकडे जातात, ही पाहणी लक्षात घेतली तर शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा तिप्पट होते.