शाळेच्या मार्गात टोल भरावा लागत असेल तर त्या मार्गावरून स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह ३०० रुपये अतिरिक्त आकारले जाण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. ही दरवाढ जून महिन्यापासून लागू होणार आहे. राज्यभरात सुमारे २०० स्कूल बसचा प्रवास टोल नाक्यांमधून होतो. यात मुंबईतील ५० तर नवी मुंबईतील ७५ स्कूल बसचा समावेश आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी स्कूल बस मालकांना टोल भरावा लागत आहे. राज्यातील अनेक स्कूल बस चालकांना दिवसभर साधारणपणे आठ फेऱ्या घालाव्या लागतात. प्रत्येक फेरीला अंदाजे ७५ रुपये टोल भरावा लागला तर दिवसभरात साधारणपणे ६०० रुपयांचा टोल बस मालकांना भरावा लागतो. महिन्याला शाळेच्या कामकाजाचे २२ दिवस धरले तरी मालकांना टोलसाठी दरमाह १३ हजार २००रुपये मोजावे लागतात. एका फेरीमध्ये २५ विद्यार्थी प्रवास करतात असे गृहीत धरले तर प्रति विद्यार्थी दरमाह ५२८ रुपये होतात. मात्र सुट्टय़ांचे दोन महिने वगळून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रति विद्यार्थी दरमाह ३०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वीच असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्कूल बसला टोल माफी देण्याची मागणी केली होती. मात्र त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली न केल्याने आम्हांला भाडे वाढ केल्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे गर्ग यांनी सांगितले. जून महिन्यापूर्वी जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीसंदर्भात निर्णय जाहीर केल्यास आम्ही आमची भाडेवाढ मागे घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.