21 August 2017

News Flash

मेहता यांना वाचविणे भाजपसाठी कठीण!

नवनव्या आरोपांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 6, 2017 12:53 AM

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता.

नवनव्या आरोपांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात विरोधकांकडून दररोज नवनवीन आरोप करण्यात येत असल्याने त्याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत मेहता यांना पाठीशी घालणे भाजपसाठी कठीण जाणार आहे.

आतापर्यंत मेहता यांच्या विरोधात आरोप झाले. आता त्यांच्या मुलाच्या विरोधात आरोप झाला. विकासकांना मदत केल्याबद्दल मेहता यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आतापर्यंत तीन आरोप केले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे चार दिवस अद्याप बाकी असून, मेहता यांची आणखी काही प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. त्यातच मेहता यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत विधिमंडळाचे कामकाज रोखण्यावर विरोधक ठाम आहेत.

विकासकांना मदत केल्याप्रकरणी होत असलेले आरोप किंवा एम. पी. मिलप्रकरणी विकासकाला मदत केल्याबद्दल     चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा यामुळे प्रकाश मेहता यांचे पाय खोलात गेले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मेहता यांचे चांगले संबंध असल्याचे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते. पण विकासकाला मदत केल्याची आणखी काही प्रकरणे बाहेर आल्यास मेहता यांना वाचविणे किंवा पाठीशी घालणे शक्य होणार नाही, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जात आहे.

मेहता यांना पाठीशी घातल्यास विरोधक तेवढाच मुद्दा करतील आणि आरोप झालेल्या मंत्र्याला सरकार पाठीशी घालत आहे हा संदेश जाणे भाजपसाठी चुकीचे ठरेल, असा पक्षात मतप्रवाह आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मंत्र्यांवर आरोप झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीविना सर्व मंत्र्यांना अभय दिले होते. मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर चौकशीची मागणी विरोधकांनी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती. तेव्हाच मेहता यांची विकेट जाणार, अशी चर्चा विधान भवनात सुरू झाली होती. त्यानंतर सतत तीन दिवस मेहता यांची बाहेर येणारी प्रकरणे लक्षात घेता मुख्यमंत्र्यांना त्यांना पाठीशी घालणे शक्य होणार नाही, अशीच चर्चा आहे. मेहता यांच्या चौकशीची झालेली घोषणा लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस हे मेहता यांच्याबाबत फार काही अनुकूल दिसत नाहीत.

 

First Published on August 6, 2017 12:53 am

Web Title: mumbai sra scam by prakash mehta
टॅग Prakash Mehta
 1. S
  sanjay more
  Aug 6, 2017 at 12:01 pm
  Areye Sarva Bhaat achanak gapp ka basle ? Datkhili basli Kay?
  Reply
 2. A
  Anil Gudhekar
  Aug 6, 2017 at 9:30 am
  आरोप आहेत ...... चौकशी करावी ... तो पर्यंत त्यांना बाजूला ठेवावे ....व चौकशी नंतर निर्णय घ्यावा
  Reply
 3. राजाराम भारतीय
  Aug 6, 2017 at 7:30 am
  आपल्या मुलाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी बनवणाऱ्या नालायक गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता या ठगाची हकालपट्टी करा.
  Reply