मुंबईतील तरुणीचा घरापर्यंत पाठलाग केल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच गुरुवारी मध्यरात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका २५ वर्षांच्या तरुणीचा दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मुंबईत रात्री प्रवास करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. असिरा तरन्नूम असे या पत्रकार तरुणीचे नाव आहे.

 

असिरा मध्यरात्री एकच्या सुमारास ऑफिसचे काम आटोपून घरी परतत होती. दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी आपला पाठलाग केल्याचे तिने सांगितले. अंधेरी पश्चिमेकडील चित्रकुट मैदानाजवळून रिक्षा पकडली. रिक्षात बसली असता अचानक दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला. अनेकदा त्यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलवर मागे बसलेला एक तरुण असभ्य भाषा वापरत होता. तर तू आमच्याबरोबर येतेस का? असे दुसरा तरुण विचारत होता. पोलिसांना फोन करून तक्रार करीन, असे मी त्यांना अनेकदा सांगितले; पण त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला, असेही असिराने सांगितले.

दोघांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचे फोटोही काढले. त्यावर ते हसत होते. त्यानंतर मी हेल्पलाईनवर फोन केला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून लगेच फोन आला. पुढील पोलीस तपासणी नाका असलेल्या रस्त्यावरून रिक्षा घेण्यास सांगितले. पण रिक्षाचालकानेही वाद घातला. पण पोलिसांकडे तक्रार करेन, असे सांगितल्यानंतर त्याने रिक्षा तपासणी नाक्याकडे वळवली, असे असिरा म्हणाली. रिक्षा जुहू सर्कलला पोहोचली. तिथे पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. हे पाहून दोघेही विलेपार्लेच्या दिशेने पसार झाले, असेही तिने सांगितले.

मी घरी सुरक्षित पोहचले का याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तीन वेळा फोन केला. अनेकदा मुली-महिला अशा घटनांवर आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच अशा लोकांचे फावते, असेही तिने सांगितले. इतकेच नाही तर तिने पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या तरुणांना ओळखत असाल तर त्यांच्याविषयी माहिती द्या, असे आवाहनही तिने केले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पाठलाग करणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. क्लिफोर्ड सॅम्युअल (वय २५), सागर सिंग (२१) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. ते दोघेही मरोळ येथील रहिवासी आहेत.