ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी सेवा देणाऱ्या वाहतूकीवर कारवाई करावी, या मागणीसाठी  २९ ऑगस्टपासून  मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी पुकारलेला संप तुर्तास मागे घेण्यात आला आहे.  जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान या दोन्ही संघटनांनी २९ ऑगस्टपासून पुकारलेला बेमुदत संप रविवारी मागे घेण्यात आला. जयभगवान रिक्षा आणि टॅक्सी महासंघाने  बेमुदत संप पुकारला होता. मात्र, सरकारने १ तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १ सप्टेंबर पर्यंत संप मागे घेण्यात आला. ओला आणि उबेर या खासगी या कंपन्यांना सरकारच्या नियमावलीत आणण्यासंबंधी ठोस निर्णय १ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्यानंतर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपाचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना होणारा त्रास तुर्तास तरी टळला आहे.   गेल्या काही दिवसांपासून काळ्या-पिवळ्या परवानाधारक टॅक्सीप्रमाणे खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही प्रमुख मागणी भगवान रिक्षा-टॅक्सी महासंघाने लावून धरली आहे. जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान या दोन प्रमुख संघटनांनी संपातून माघार घेतली असली, तरी  ३१ ऑगस्ट रोजी मुंबई ऑटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनने संपाची हाक कायम ठेवली आहे. यापूर्वी जय भगवान महासंघाकडून पुकारण्यात आलेल्या संपाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस आणि मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे शशांक यांनी पाठिंबा दिला नव्हता.