मुंबईतल्या लोकल ट्रेनमधले स्टंट विक्रोळीतल्या तरूणाच्या जीवावर बेतले आहेत. या स्टंटमुळे कळवा खाडीत पडून गणेश इंगोले या १८ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. गणेश इंगोले हा डान्स क्लासला जायचा. त्यामुळे त्याला डान्स स्टेप्स करायची सवय होती. तशा स्टेप्स आणि स्टंट तो ट्रेन मध्ये करत होता, त्या दरम्यान रेल्वे पोलिसांनी त्याला पकडून समज देऊन सोडूनही दिले होते. मात्र त्याच्या स्टंट करण्याची सवय सुटली नाही. या सवयीनेच त्याचा घात केला. त्याचा हा मृत्यू त्याच्यासोबत असलेल्या इतर स्टंटबाज पाच दिवस लपवून ठेवला. पोलिसांनी चौकशीसाठी जेव्हा त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले, त्यानंतर गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

१० जून रोजी गणेश त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. तो परत आलाच नाही. एक दिवस उलटूनही गणेश घरी आला नाही म्हणून गणेशच्या पालकांनी ११ जूनला पोलिसात गणेश हरवल्याची तक्रार दिली.  त्याचे मित्रही त्याच्याबाबत काही माहिती द्यायला तयार नव्हते. विक्रोळी पार्कसाईट भागात राहणारा गणेश नुकताच १२ वी झाला होता. तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर पडला. १० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तो लोकलमध्ये स्टंट करत होता. एवढेच नाही तर कळवा मार्गावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची टोपीही त्याने काढली होती. चालत्या ट्रेनमधून टोपी काढण्यासाठी तो पूर्णपणे खाली झुकला होता असेही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर तो आणि त्याचे मित्र स्टंट्स करत होते. अशात कळवा खाडीजवळच्या एका पोलचा त्याला धक्का लागला. त्यानंतर गणेश खाडीत पडला.

हा सगळा प्रकार घडल्यावर गणेशचे मित्र मुंब्रा स्टेशनला उतरले, त्यानंतर पुढची ट्रेन पकडून कळवा खाडीजवळ आले. तिथे त्यांनी गणेशची बरीच शोधाशोध केली. मात्र त्यांना गणेश सापडला नाही. इकडे गणेशचे आई आणि वडिलही त्याला शोधत होतेच. १० तारखेला बाहेर पडलेला गणेश ११ जूनपर्यंत आला नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही गणेशचा शोध घ्यायला सुरूवात केली. गणेश आम्हाला भेटला, पण नंतर कुठे गेला हे ठाऊक नाही असे त्याच्या इतर स्टंटबाज मित्रांनी गणेशच्या आई-वडिलांना सांगितले. गणेश कळवा खाडीत पडला आणि मेला आहे, ही गोष्टी त्याच्या मित्रांनी लपवली.

गणेशचे मित्र फार काळ ही घटना लपवू शकले नाहीत, अखेर त्यांनी गुरूवारी (१५ जून) पोलिसांनी जाऊन सगळा घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतले. तसेच नेमके काय घडले याची कसून चौकशी केली. गणेश आणि त्याच्या मित्रांना आत्तापर्यंत दोनवेळा रेल्वे पोलिसांनी स्टंटबाजीबाबत पकडून समज देऊन सोडून दिल्याची माहितीही यानंतर समोर आली. गणेशच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांचे पथक करते आहे. मात्र पाच दिवस उलटून गेल्यामुळे त्याचा मृतदेह सापडण्यात अडचणी येत आहेत, असे पोलीस निरीक्षक व्ही. एम. जाधव यांनी म्हटले आहे. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार, गणेशचे मित्र आम्हाला घडलेला प्रकार सांगायला आले तेव्हा खूप घाबरले होते. त्यांना ताब्यात घेऊन आम्ही जी चौकशी केली त्यामुळे गणेशचा मृत्यू कसा झाला याचा छडा लावू शकलो, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

लोकलमध्ये स्टंटबाजी करू नका, ती तुमच्या जीवावर बेतेल असे सामाजिक संदेश कायमच रेल्वेकडून दिले जातात. तरीही गणेश आणि त्याच्या मित्रांप्रमाणे अनेक मुले जोशात स्टंट करताना दिसतात. स्टंट करताना हे सगळेच स्टंटबाज आयुष्याच्या तारेशी छेडछाड करत असतात. निदान या मृत्यूनंतर तरी स्टंटबाजांना थोडीफार अक्कल येईल अशी अपेक्षा आहे.