गेल्या काही दिवसांपासून थंडी अनुभवणाऱ्या मुंबईकरांना आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुंबईत शुक्रवारी ३३.९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या जानेवारी महिन्यातील हे सर्वात जास्त तापमान ठरले आहे. उत्तरेकडून येणारे वारे क्षीण झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २० डिसेंबरपासून कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा खाली होते. त्यामुळे मुंबईकरांना गारवा अनुभवायला मिळत होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. कमाल तापमानाप्रमाणे किमान तापमानातही वाढ झाली आहे. गुरुवारी १५.८ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी यात वाढ झाली व ते १८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.