सोमवारी उन्हाचा तडाखा मिळालेली मुंबई दुसऱ्या दिवशीही तापलेलीच राहिली. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. समुद्राच्या अगदी जवळ असल्याने कुलाबा येथे तुलनेत कमी तापमानाची म्हणजे ३३.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. पुढील दोन दिवसही तापमानही राहण्याची शक्यता असल्याने   मतदानाच्या दिवशी (गुरुवारी) दुपारच्या वेळेस बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.
राजकीय प्रचाराचा शेवटचा दिवस कार्यकर्त्यांच्या फेऱ्यांनी आणि तापमापकातील पाऱ्याने गाजवला. सोमवारी तापमानातील पारा चाळीशीच्या जवळ गेला. मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि मुंबईकरांना घाम फुटला. लोकल ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करताना तर मुंबईकरांचे रुमाल ओलेचिंब होत होते. रस्त्यावरील ताकवाल्याकडे किंवा लिंबू सरबताच्या गाडीवर थंड पेय पिण्यासाठी मुंबईकरांची गर्दी झाली होती.
तापमान नियंत्रित ठेवणारे समुद्रावरील दमट वारे सकाळऐवजी दुपारी वाहू लागल्याने सोमवारी मुंबईकर घामाच्या धारानी न्हाऊन निघाले. चार दिवसांपूर्वी रात्रीचे तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस एवढे खाली उतरत होते. मात्र गेल्या दोन रात्री पारा २८ अंशाच्या घरात होता. त्यामुळे पहाटे किंवा रात्री जाणवणारा गारवा वातावरणातून निघून गेल्याची चर्चा  सुरू होती.