वडाळा-कासारवडवली आणि अंधेरी-मानखुर्द जोडले जाणार

मुंबई आणि ठाण्याला मेट्रोने जोडणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक वेगवान करणाऱ्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिपरिषदेच्या मंगळवारच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर डी.एन.नगर-मंडाळे (अंधेरी-मानखुर्द) या मेट्रो मार्ग-२ (दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द) चा भाग असलेल्या मेट्रो मार्ग टप्पा क्र-२ ब प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली.  दोन्ही महापालिकांच्या पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा( एमएमआरडीए) मानस आहे.

सुमारे १४ हजार ५४९ कोटी रूपये खर्चाच्या भक्तीपार्क-वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. एप्रिल २०१७ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करून २०२१मध्ये या मार्गावर मेटे धावू शकेल. त्याचा मुंबई-ठाण्यातील आठ लाख लोकांना फायदा होईल. मेट्रो मार्ग-२ (दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द) चा भाग असलेल्या मेट्रो मार्ग टप्पा क्र-२ ब या प्रकल्पाची किंमत १० हजार ९८६ कोटी आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा निधी प्राधिकरणाने स्वत:च्या उत्पन्नातून तसेच कर्ज उभारून करायचा आहे.

वडाळा-ठाणे मार्गावरील स्थानके

भक्ती पार्क मेट्रो – वडाळा टीटी – अणिक नगर बस डेपो- सुमन नगर- सिद्धार्थ कॉलनी-अमर महल जंक्शन – गरोदिया नगर – पंत नगर -लक्ष्मी नगर – श्रेयस सिनेमा- गोदरेज कंपनी – विक्रोळी मेट्रो – सूर्या नगर – गांधी नगर – नवल हौसिंग – भांडुप महापालिका – भांडुप मेट्रो – शांग्रिला – सोनापूर – मुलुंड फायर स्टेशन- मुलुंड नाका – तीन हात नाका- ठाणे आरटीओ- मनपा मार्ग- कॅडबरी जंक्शन – माजीवडा – कापुरबावडी – मानपाडा –  टिकूजीनी-वाडी – डोंगरी पाडा- विजय गार्डन – कासारवडवली

अंधेरी-मानखुर्ददरम्यानची स्थानके

डीएननगर, ईएसआयसी नगर, प्रेमनगर, इंदिरा नगर, नानावटी रुग्णालय, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल महाविद्यालय, वांद्रे, एमएमआरडी, प्राप्तिकर कार्यालय, ‘आयएनएफएस’, एमटीएनएल मेट्रो, स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनल, ईईएच, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द.