हवामानशास्त्र विभागाच्या सर्व अंदाजांना हुलकावणी देणाऱ्या पावसासाठी आणखी किमान दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मराठवाडावगळता राज्यात मागील चार दिवस दडी मारलेला पाऊस आणखी दोन पावले दूरच असून बुधवारपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी येतील.

पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असलेल्या मराठवाडय़ात यावेळी पावसाने सुरुवातीपासून वरदहस्त ठेवला. गेले तीन दिवस तेथेही पाऊस नाही. कोकणात सिंधुदुर्गवगळता इतरत्र गेले चार दिवस पाऊस पडलेला नाही.

राज्यातील उर्वरित भाग पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. मोसमी वारे कोकणात ८ जून व मुंबईत १२ जून रोजी आल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी एखाद-दुसऱ्या मुसळधार सरीचा अपवादवगळता पाऊस अजूनही दूरच राहिला आहे.  रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये बहुतांश ठिकाणी बुधवारपासून सरी येतील.

मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये बुधवारपासून पावसाच्या सरींची संख्या वाढू शकेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही मंगळवार- बुधवारपासून पाऊस परतण्याची आशा आहे, असे हवामानशास्त्र विभागाचा अंदाज सांगतो. मात्र गेल्या १० दिवसात पावसाने हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजाला हुलकावणी दिली आहे.

untitled-17