चर्चगेट अपघात प्रकरणानंतर टर्मिनस स्थानकांमधील बंपरचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्याबाबत काहीच उपाययोजना झाल्या नसल्याचे मंगळवारच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या अपघातानंतर स्पष्ट होत आहे. या अपघातात गाडीचा वेग फक्त ताशी १५ ते २० किलोमीटर असल्याचा दावा रेल्वे अधिकारी करत आहेत. मात्र एवढय़ा कमी वेगात गाडी बंपरला धडकूनही बंपर तुटल्याने बंपरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये झालेल्या या अपघातादरम्यान गार्ड चालवत असलेल्या गाडीचे पाश्र्वपथन (शंटिंग) करण्यात येत होते. या वेळी गाडीचा वेग ताशी १५ किलोमीटर असावा, असा रेल्वेचा नियम आहे. मात्र या प्रकरणात गार्ड गाडी चालवत असल्याने गाडीचा वेग जास्त असल्याची शक्यताही निर्माण होत आहे. ही गाडी ताशी २० किलोमीटर एवढय़ा कमी वेगाने धडकली, तरी बंपर मोडून पडले.
याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, बंपर सदोष नसून विविध बनावटीच्या गाडय़ा आणि त्यांची उंची यांतील फरकामुळे बंपर तुटल्याचे त्याने सांगितले. गाडीचा बंपर आणि फलाटावरील बंपर एकमेकांना योग्य प्रकारे टेकल्यानंतरच गाडीचा भार बंपर सहन करू शकतो. मात्र मध्य रेल्वेवर पाच विविध बनावटीच्या गाडय़ा आहेत. या गाडय़ांच्या उंचीत थोडाफार फरक पडतो. त्यामुळे यातील प्रत्येक गाडीचा बंपर फलाटावरील बंपरवर वेगवेगळ्या ठिकाणी आपटतो.

*सोमवारी मध्यरात्री सिमेन्स गाडीचा अपघात झाला. ही गाडी आणि तिची आघातशोषी यंत्रणा (शॉक-अॅब्झॉर्बर) यांची उंची    जास्त आहे. त्यामुळे ही गाडी फलाटाच्या बंपरच्या वरच्या बाजूला आपटली. परिणामी बंपर गाडीचा पूर्ण भार शोषू शकला  नाही आणि तो मोडून पडला, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ही गोष्ट खरी असली, तरी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस  स्थानकात अद्ययावत बंपर नसल्याचेही स्पष्ट होत आहे.