स्वस्छता अभियान आणि सद्भावना रॅली

गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विधी विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून त्यात जवळपास ७०० विद्यार्थी व १५ स्वयंसेवी संस्था, विधीतज्ज्ञ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्वस्छता अभियान आणि सदभावना रॅलीचे उद्घाटन होणार आहे.
सकाळी ९.३० वाजता सकाळी ९.३० वाजता या अभियानाला सुरूवात होईल. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, डी.एन.रोड, आझाद मैदान या भागात हे स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. आझाद मैदानात कुलगुरू डॉ. संजय देशमुख विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
याच दिवशी विश्व अहिंसा दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठाने गेट-वे-ऑफ इंडिया येथे सायंकाळी ४.३० वाजता भजनसंध्याचे आयोजन केले आहे. यात निर्माता-दिग्दर्शक विरेंद्र प्रधान, अभिनेत्री स्पृहा जोशी, संगीतकार निलेश मोहरीर, गायक सिध्दांत महादेवन, मृदुला भिडे-जोशी, वैशाली भैसने-माडे आणि जाझिम सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग, सांस्कृतिक विभाग, संगीत विभाग, लोककला अकादमी, आजीवन अध्ययन विभाग, एनएसएस आणि एनसीसी या विभागांच्या संयुक्त विद्यमाने या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.